… तर मी राजकारणातून निवृत्त होणार – कुमारस्वामी

नवी दिल्ली : मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी बांधील असून, जर मी शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही देऊ शकलो तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन, राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलं आहे. ते पंतप्रधानांच्या भेटी नंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले मी सत्तेवर आल्यानंतर चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं म्हणालो होतो. मात्र आपल्याला बहुमत नसल्याने अनेक मर्यादा आहेत. सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करत असून, कर्जमाफीसाठी आपल्याला आणखी थोडा वेळ हवा आहे.

जर मी तसं करु शकलो नाही तर राजकारणातून निवृत्ती घेईन हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मी मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा देईन. तुम्ही थोडा वेळ वाट पाहू शकत नाही का ? असा सवाल कुमारस्वामी यांनी यावेळी पत्रकारांना विचारला. तसेच शेतकरी कर्जमाफीबाबतची विस्तृत माहिती बुधवारी जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले.