घाटीत महिलांसाठी ऑक्सिजनसुविधेसह ४० खाटांचा नवीन वॉर्ड

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील जुन्या वॉर्ड क्रमांक चारचे नूतनीकरण करुन अद्यावत अशा प्रकारच्या ४० ऑक्सिजन असलेल्या खाटांचा स्वतंत्र नवीन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमधे महिला रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय वॉर्डमध्ये सर्व खाटांना ऑक्सिजनची सुविधा देखील आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने घाटीत जुन्या मेडिसिन विभागाच्या इमारतीत नवीन वॉर्डची निर्मिती होऊन वैद्यकीय सेवेस सुरुवात झाली. या वॉर्डचे उद्घाटन जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते झाले. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मेडीसीन विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांची उपस्थिती होती.

घाटीमध्ये मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होतात. त्यांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी या नवीन वॉर्डचा अधिक उपयोग होणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर या नवीन वॉर्डात दाखल झालेल्या रुग्णांशी मनमोकळा संवाद साधला.

या वॉर्डमध्ये सध्या कोविड निगेटीव्ह महिला रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या वार्डच्या बाजूस उभारण्यात आलेल्या चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चर (सीएमआयए)च्या वतीने घाटीस देण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचीही पाहणी देखील केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP