धक्कादायक! तुरुंगात फेसबुक लाइव्ह करत कैद्याची मुख्यमंत्र्यांना धमकी   

चंदिगढ : तुरुंगात फेसबुकवर लाइव्ह करत कैद्याने मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याची  धक्कादायक घटना पंजाबच्या फरीदकोटमधील एका तुरूंगात घडली आहे. गोविंद सिंग असे या कैद्याचे नाव असून त्याला याचवर्षी एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. त्याने तुरुंगात सुमारे तीन मिनिट लाइव्ह करत मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना धमकी दिली.मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतच या कैद्याने राज्याचे पोलीस महासंचालक सुरेश अरोरा आणि तुरूंग मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना देखील धमकी दिली.  त्याने फेसबुकवर लाइव्ह येत अमरिंदर सिंग यांना तुमची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हंटलं आहे.

तसेच  भटिंडा येथील रॅलीदरम्यान अमरिंदर सिंग यांनी खोटे बोलल्याचा उल्लेख गोविंदने व्हिडिओत केला आहे. पंजाबमधील अंमली पदार्थाचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे वचन अमरिंदर सिंग यांनी या रॅलीत दिले होते. पण त्यांनी तसे केले नाही. अमरिंदर सिंग यांनी खोटे वचन दिल्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन देवाची माफी मागायली हवी. पंजाबमध्ये आजही अंमली पदार्थ प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध होतात. माझे भाऊ-बहीण अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत, असे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.