‘माणुसकीच्या आड येणारी आचारसंहिता आम्ही मानणार नाही’

udhav thakre

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात दुष्काळ भयानक आहे. मतदान झाल्यानंतर आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी ताबडतोब कामे सुरू करणार म्हणजे करणारच. पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून ही कामे करणार आहोत. त्यामुळे निवडणूक आयोगालाही सांगतोय कृपा करून आचारसंहितेचा बडगा आम्हाला दाखवू नका. माणुसकीच्या आड येणारी तुमची आचारसंहिता आम्ही मानणार नाही अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेनेची नेमकी भूमिका काय ? याबद्दल भाष्य केले.  यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, नगर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार नरेंद्र दराडे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, आमदार बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात दुष्काळ भयानक आहे. त्यामुळे मी सांगितले आहे की, मतदान झाल्यानंतर ताबडतोब दुष्काळग्रस्तांसाठी काम सुरू करायचे. अनेकदा प्रसारमाध्यमांत येते प्रचाराच्या मुद्दय़ांवरून दुष्काळ गायब. यामागे कारण आहे आचारसंहिता. काही करायला गेले की आचारसंहितेचा बडगा बसतो. पण निवडणूक आयोगाला सांगतो मतदान झाल्यानंतर कृपा करा. आचारसंहितेचा बडगा आम्हाला दाखवू नका. कारण माणुसकीची शिकवण दाखविणाऱया साईबाबांना आम्ही दैवत मानतो. त्यामुळे माणुसकीच्या आड आम्ही तुमची आचारसंहिता मानणार नाही. मतदान झाल्यानंतर दुष्काळासाठी आम्ही काम सुरू करणार म्हणजे करणारच. पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून सुद्धा काम करू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.