निमलष्करी दलाच्या निवृत्त जवानांनी मोदी सरकार विरोधात पुकारले आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आता निमलष्करी दलांनी मोदी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. भारताच्या लष्कराच्या तुलनेत निमलष्करी दलांना पुरेश्या सुविधा सरकार कडून मिळत नाही आणि अशा अनेक मुद्यांच्या जोरावर सीआरपीएफ, बीएसएफ, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस अशा निमलष्करी दलाच्या निवृत्त जवानांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आज आंदोलन केले आहे.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, सरकारकडून आम्हाला नेहमी लष्कराचे सावत्र भाई असल्यासारखी वागणूक मिळते. आजपर्यंत आम्हाला शहीदांचा दर्जा देखील दिला गेलेला नाही. वन रँक वन पेन्शन ही योजना सरकारकडून अजून लागू करण्यात आलेली नाही. तसेच 2004 पासून निमलष्करी दलाला निवृत्ती वेतन देखील दिले गेलेले नाही. त्यामुळे या निमलष्करी दलाच्या आंदोलनकार्त्यांकडून सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकार निमलष्करी दलातील जवानांसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील’, असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.