fbpx

असदुद्दीन ओवेसींच्या शपथविधी वेळी सभागृहात ‘जय श्री राम’ अशा घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन लोकसभेत सुरु आहे. या अधिवेशनात संसदेच्या नवनियुक्त सदस्यांना खासदारकीची शपथ देण्यात येत आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली शपथ घेतली. यानंतर सायंकाळी राहुल गांधी यांनी शपथ घेतली. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी जय श्री रामचे नारे दिले होते. आजही एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी उठले असता जय श्री रामाची घोषणा देण्यात आली. यावेळी ओवेसी यांनी अजून मोठ्याने घोषणा देण्याचे आवाहन केले.

असदुद्दीन ओवेसी शपथेसाठी जेव्हा आसनावरून उठले तेव्हा भाजपाच्या सदस्यांनी जय श्रीराम आणि वंदे मातरमचे नारे देण्यास सुरुवात केली. यावर ओवेसी यांनी हात उंचावत अजून जोरात असा इशारा केला. तसेच शपथ घेतल्यानंतर ओवेसींना जय भीम आणि अल्लाह-हू-अकबरचा नारा दिला.याबाबत ओवेसी म्हणाले की, मला असे वाटतेय की भाजपाच्या लोकांना मला पाहिल्यानंतर जय श्री रामची आठवण येते. जर असे असेल तर चांगली बाब आहे यावर मला काही आक्षेप नाही. मात्र, वाईट एवढेच वाटते या खासदारांना बिहारमध्ये मरण पावलेल्या मुलांची आठवण आली नाही.

दरम्यान सभागृहा मधील काही भाजप खासदारांचे वर्तन हे चुकीचे असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे. कारण लोकसभेच्या सभागृहात धर्म, जात, वंश यावरून भाष्य करणे चुकीचे मानले जाते. तरी देखील सभागृहात शपथविधी वेळी ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या जातात.