fbpx

पवारांच्या गडात विकास प्रतिक्षेत, २२ दुष्काळी गावासह ग्रामीण भागात उपेक्षाच

संजय चव्हाण : बारामती लोकसभा मतदार संघात एकीकडे सुजलाम-सुफलाम बारामती, चकचकीत-झगमगाट, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय उद्योग, व्यवसाय, बँका, शोरुम आहे, तर दुसरीकडे भोर, पुरंदर, इंदापूर, दौड तालुक्यातील दूरवरच्या गावातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे असे जाणवते. प्रचंड दुष्काळग्रस्त भाग, पिण्याच्या पाण्यासाठी हिवाळ्यापासून टँकरची वाट पाहावी लागते. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याची गंभीर समस्या आज ग्रामीण भागात आवासून उभी आहे. रोजगार नसल्याने तरुण पिढीच्या भविष्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आसल्याचे भयाण वास्तव बारामती मतदार संघाचा दौरा करताना समोर आले, त्यामुळे पवारांच्या गडातही विकास आजही प्रतिक्षेतच आहे. पश्चिम बारामतीतील २२ गावातील दुष्काळी परिस्थितीमुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अनेक उद्योग आणि पाण्याची व्यवस्था करून बारामती शहर व लगतच्या माळेगाव, सोमेश्वर, निंबूत, वडगाव निंबाळकर आदी गावांना सधन बनविले. येथे पाटबंधारे विभागाच्या मदतीने सर्वत्र पाण्याची व्यवस्था करून पीक व्यवस्थापन आणि फळबागायतीसाठी वातावरण निर्मिती करून दिली, परिणामी येथील नागरिक अधिक सधन होत गेल्याचे दिसून येत आहे. चलन वाढल्यामुळे नागरिकांच्या गरजा ही वाढल्या आहे, त्याला लागूनच पूरक व्यवसाय ही वाढल्याचे दिसून आले.

दुसरीकडे बारामतीपासून १०-१५ किलोमीटर अंतरावर सुरू होणारे अंजनगाव, जळगाव-सुपे, कऱ्हाटी, तरडोली, पवारवाडी, बाबुर्डीसह दुष्काळग्रस्त २२ गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीर असल्याचे चित्र दिसून आले. पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि गेली दोन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी राजकीय नेत्यांकडे वेळच नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. बारामती शहरात व लगतच्या परिसरात दूधाचे मोठ-मोठे धंदे, पण या दुष्काळग्रस्त भागात पाणी व चाऱ्या अभावी जनावरांचे पोट खपाटीला गेल्याचे चित्र आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि विकासाच्या प्रत्येक ठिकाणी बारामती तालुक्यात काही किलोमीटरच्या अंतरामध्ये विषमतेची प्रचंड मोठी दरी असल्याचे निदर्शनास आले. दौड तालुक्यातील लिंगली, गोपाळवाडी आणि गिरिम ही काही प्रमाणात सधन गावे, मात्र आजूबाजूच्या परिसरात अवस्था बिकट असल्याचे निदर्शन आले.

भोर, पुरंदर तालुक्यातील रस्त्याची दैना

बारामती या मतदार संघात खडकवासला, पुरंदर, भोर, बारामती, दौंड आणि इंदापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील मतदार या मतदारसंघामध्ये जास्त आहे. दुष्काळग्रस्त आणि अविकसित भागातून फिरताना राजकर्त्यांच्या नाकर्तेपणावर बोलण्यासाठी मतदार राजा टाळत होता. हे आमच्या नशिबी आहे, असे उत्तर या भागातील नागरिकांनी दिले, मी विचारताच सांगत होते, तुमच काय जात साहेब सांगायला, येथे आम्हाला रहावे लागते. विरोधामध्ये जाहीरपणे बोलण्याची हिमंत लोकांमध्ये नव्हती. रस्त्याचे प्रश्न गंभीर आहे. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या गावात जाणाऱ्या रस्तांची चाळण झाल्याचे दिसून आले. यासाठी स्थानिक आणि खासदार काही करताना दिसत नसल्याचे सांगत होते. अनेक ठिकाणीची रस्ते व पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे चित्र दिसले. लोकांना निवडणुकी विषय विचारल्यावर बदल व्हावा, असे वाटते, पण तो कसा होणार समोर उमेदवारचं चांगला नसल्याची प्रतिक्रिया लोकांकडून येते. वडगाव निबांळकर हे गाव भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे माहेर असल्याने येथील नागरिकांनी आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी आहोत, मात्र मतदान पवारांनाच करणार आहोत. नाही, तर आमचे पाणी बंद होईल, अशी भितीवजा प्रतिक्रिया दिली.

पाण्यासाठी वणवण

नीरा -डाव्या कालव्यामुळे सधन झालेल्या बारामती शहर, माळेगाव, सोमेश्वर, वडगाव निंबाळकर व लगतच्या काही गावांमधील लोकांनी पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दुसरीकडे मोरगाव, पवारवाडी, प्रामुख्याने दुष्काळग्रस्त गावांच्या लगत असलेल्या सुपिक भागात जगो-जागी पाण्याच्या बाटल्यांचे प्लॅंट टाकण्यात आलेल्याचे निदर्शनास आले. या पाण्याच्या प्लॅंटवाल्यांचे सर्वांत मोठे ग्राहक हे दुष्काळग्रस्त २२ गावांतील शेतकरीचं आहेत. सरकारकडून आठ-दहा दिवसांतून टँकरद्वारे ५००-६०० लिटर पाणी मिळत असल्याने नाईलाजाने अनेक वेळा ३० रुपयांचा बाटला विकत घ्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया येथील शेतकरी देत आहेत.

पवारांच्या गडात भाजपचे थंडा थंडा ‘कूल’

लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहूमत मिळेल आणि केंद्रात सत्ता स्थापन करेल हे आताचं सांगणे उचित होणार नाही, मात्र महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघात काहीअंशी चित्र स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीचे ज्वर वाढले असतानाचं बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक पक्षाचे उमेदवार जनमताचे ज्वर वाढवत आहेत. येथे मुख्य लढाई भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होणार आहे. तसे बारामती हा पवारांचा गड येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार १९९९ व २००४ ला निवडून गेले, तर २००९ व २०१४ पवार यांच्या कन्या सुप्रिया सदानंद सुळे लोकसभेत निवडून गेल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकतर्फी निकाल असे आजवरचे चित्र होते. मात्र, गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातही भविष्यात बदल घडू शकतो, याची चुणूक पाहायला मिळाली. त्यामुळे भाजपने यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्र अवलंबिले आहे, मात्र जनमत कौल आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आल्याचे दिसत नाही. सध्या तरी सुप्रिया सुळे यांचे पारडे जड असल्याचे चित्र असून पवारांच्या गडात कांचन कुल यांना जनमताचा प्रतिसाद थंडाच वाटतो आहे.

या मतदार संघात खडकवासला, पुरंदर, भोर, बारामती, दौंड आणि इंदापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आजपर्यंत ग्रामीण भागातील मतदार या मतदारसंघामध्ये जास्त होते. मात्र, मतदारसंघ फेररचनेनंतर खडकवासला या शहरी भागाचा समावेश या मतदारसंघात झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही डोकेदुखी झाली आहे. गेल्या निवडणुकीत शहरी मतदारांनी सुळे यांना नाकारले होते. ही धोक्याची सूचना असल्याने सुळे यांनी गेल्या वर्षभरापासून खडकवासल्यावर लक्ष केंद्रित केले आहे, मात्र येथील मतदार हा आजही काही प्रमाणात भाजपच्या बाजूने झुकलेला दिसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे त्यांचा हक्काचा बारामती मतदारसंघ. कुल मूळच्या बारामतीच्या असल्या, तरी त्यांचे भावनिक आवाहन कितपत मतदारांवर प्रभाव टाकेल, याबाबत साशंक स्थिती आहे. बारामतीतील मतदार कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. भोर मतदारसंघामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्याचबरोबर भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे सुळे यांचे मताधिक्य वाढते. या वेळीही अशी स्थिती राहू शकते. या ठिकाणी मते मिळविण्यासाठी कुल यांना पराकाष्ठा करावी लागणार आहे. भाजपची या मतदारसंघात फारशी ताकद नाही. या ठिकाणी शिवसेनेवर कुल यांना अवलंबून राहावे लागणार आहे. इंदापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्याने त्यांच्यात मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. या वेळी काँग्रेसने साथ दिल्यास सुळे यांना मतांची आघाडी घेता येणार आहे. कुल यांना इंदापूरमध्ये मते मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे दिसून आले.