fbpx

‘पराभव समोर दिसत असल्यानेच भर उन्हात पवार कुटुंबीय फिरत आहेत’

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपुत्र पार्थसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. पार्थची आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार आणि चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी-चिंचवड मध्ये बैठका घेत असून पार्थचा प्रचार करत आहेत. यावरून पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे.याच मुद्द्यावरून शिवसेनेचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली.

४० अंश तपमान असताना भर उन्हात पवार कुटुंबीय फिरत आहे याचा अर्थ त्यांचा पराभव निश्चित असल्याचं त्यांना समजलं आहे अशी खोचक टीका श्रीरंग बारणे यांनी केली. बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले.

श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व नाकारले असून त्यांचा महानगर पालिकेच्या निवडणुकीत दारूण पराभव झालेला आहे.मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचे प्राबल्य नाही.केवळ घराण्यातील व्यक्ती पुढे करून राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत आहे. या अगोदर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याची आठवण बारणे यांनी करून दिली.