९० टक्के आमदारांचा पाठींबा अजितदादांना होता, मात्र मी मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्री केलं – पवार

माढा : छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर ९० टक्के आमदारांनी अजितदादांना पाठींबा दिला होता, मात्र मी विजयसिंह मोहिते पाटील यांना पसंती देत उपमुख्यमंत्री केले, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. आज मोहिते पाटलांवर अन्याय झाल्याची टीका केली जाते, पंरतु त्यांना काय काय दिले याचा विचार करताना मोठी यादी पुढे येते, असा टोला पवार यांनी लगावला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी नातेपुते येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढ्याची लढाई प्रतिष्ठेची बनवली आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने माढ्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, आज शरद पवार यांनी नातेपुते येथे सभा घेत मोदी आणि मोहिते पाटलांवर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री पदासाठी ९० टक्के आमदारांनी दुसऱ्या नावाला पाठिबा दिला होता, पण मी विजयदादांना उपमुख्यमंत्री केले. आमदारांनी सुचवलेले दुसरे नाव अजितदादाचं होत. मोहिते पाटील यांना बांधकाम, ग्रामविकास, पाठबंधारेमंत्री केले. साखर संघाचे अध्यक्षपद तसेच साखरे संदर्भातच्या अभ्यास गटात त्यांचा केल्याचा पाढा यावेळी पवारांनी वाचला आहे. यापुढे आपण माळशिरस तालुक्याची जबाबदारी घेत असून, राजकीय दबावामुळे कोणाचे काम अडल्यास स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करले असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजपच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला देखील पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेत भाषण करतात, राज्यामध्ये भयानक दुष्काळ असल्याने ते त्यावर बोलतील हि अपेक्षा होती. पण मोदींनी दुष्काळावर एक शब्दही काढला नाही. पवारांच्या घरात कलह सुरु आहेत, म्हणून मोदी सभांमध्ये सांगतात. आता आम्ही घरात जीवाभावाने राहतो, पण मोदी एकटे असल्याने त्यांना घर कसं चालत हेच माहिती नाही, असा घणाघात पवारांनी केला आहे.

ऊस शेती आपल्या भागामध्ये प्रमुख उत्त्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसावर प्रक्रिया करून त्यांना जास्त पैसा देण्याचं काम आम्ही केलं आहे. मोदी माझे लक्ष साखर उद्योगाकडे जास्त असल्याचं सांगतात, पण ऊस शेतकरी आणि साखर धंद्याला मदत करण्यासाठीच माझे राजकारण असल्याचं पवार म्हणाले.Loading…
Loading...