काहीजण सेल्फी काढत असतील तर परिस्थिती सुधारणार नाही : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात नद्यांना पूर आला आहे. या पुरात नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांचे पशुधन वाचवण्यात अपयश आले आहे. तसेच सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

या परिस्थितीची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाहणी करत होते. महाजन हे बोटीत स्वार होऊन कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये फिरत होते, यावेळी महाजन यांच्या समवेत बोटीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाईल उंचावला, तर महाजन हे हसत सेल्फी देत होते. गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत. काहीजण तर सेल्फी काढण्यासाठी जात असतील, तर ही स्थिती लवकर ठीक होईल, असं मला वाटत नाही, अशा शब्दात पवार यांनी महाजनांचं नाव न घेता टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांनाही ‘मुख्यमंत्री म्हणत आहेत की, राजकारण करू नका. पण, हे काही राजकारण नाही. पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे, हे राज्य सरकारला सांगण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्तांना दहा-पंधरा हजार रुपयांची मदत देण्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन चांगली घरे बांधून देणे महत्त्वाचे आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसही सर्व आमदार, खासदार यांचा एक महिन्याचा पगार व लोकवर्गणीतून जमा झालेला ५० लाखाचा निधी पूरग्रस्तांना देणार आहे.

महत्वाच्या बातम्या –