fbpx

उर्जित पटेलांपाठोपाठ RBI डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा : आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पाठोपाठ डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील आपला कार्यकाळ  पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चांनी उधान घेतले आहे. विरल आचार्य हे २०१७ साली डेप्युटी गव्हर्नर झाले होते. मात्र कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीचं आचार्य यांनी आपला राजीनामा दिला आहे.

उर्जित पटेल यांना आरबीआयचे गव्हर्नर केल्यानंतर २३ जानेवरी २०१७ मध्ये आचार्य यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी निवड करण्यात आली होती. उर्जित पटेल यांनी डिसेंबर २०१८ आरबीआयच्या स्वायत्ततासह अनेक विषयांवर सरकारच्या वाढत्या मतभेदांमुळे राजीनामा दिला होता. त्यामुळे उर्जित पटेल यांच्याप्रमाणे विरल आचार्य यांना देखील सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाचा अनुभव आला की काय? अशा चर्चा होत आहेत. मात्र विरल आचार्य यांनी राजीनामा देतेवेळी स्पष्ट कारण सांगितले नाही.

दरम्यान आचार्य यांनी मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे मुंबई आयआयटीमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पीएचडी केली. पीएचडीनंतर २००१ ते २००८ या काळात त्यांनी ‘लंडन बिझनेस स्कूल’मध्ये काम केले. बँक ऑफ इंग्लंड, तसेच बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटच्या फेलोशिपही त्यांना मिळाल्या आहेत. २०१७ मध्ये आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी त्यांची नियुक्ती झाली होती.