कृत्रिम पावसाच्या नावाखाली नुसत्याचं आकाशात घिरट्या, १७ कोटींचा चुराडा

सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याच्या निमित्ताने यावर्षी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील दोनशे किलोमीटर परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. आतापर्यंत सुमारे १७ कोटींचा खर्च होऊनही प्रयोगाच्या नावाखाली विमानाच्या अवकाशात नुसत्याच घिरट्याच सुरु आहेत. प्रयोग अद्याप सुरुच असल्याने त्यासाठी आणखी वाढीव सात ते आठ कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील वर्षीच्या दुष्काळाच्या झळा अद्याप संपलेल्या नसून सोलापुरातील मोहोळ, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यांसह मराठवाडा व विदर्भातील ९० हून अधिक तालुक्यातील बळीराजाला नैसर्गिक असो की कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने टॅंकरची संख्या अद्याप कमी झाली नसून भुगर्भातील पाणी पातळीही घटलेलीच आहे.

आतापर्यंत राज्यात २०१५ आणि २०१८ मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. यंदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याने त्यातून दुष्काळाच्या झळा कमी होतील, अशी आशा बळीराजाला होती. मात्र, कोट्यवधींचा चुराडा करुनही प्रयोगाच्या नावावर कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानांच्या अवकाशात नुसत्याच घिरट्या सुरुच असल्याचे चित्र आहे. हा प्रयोग यशस्वी झाला का, त्यातून किती पाऊस पडला, यशस्वी प्रयोगासाठी ठोस संशोधन काय असावे, यावर कोणीच बोलत नाही.

दरम्यान, पाऊस किती पडला की पडलाच नाही हे सांगता येणार नाही. पावसाळा संपेपर्यंत प्रयोग सुरुच राहणार आहेत. असे , राष्ट्रीय चक्रिवादळ धोके प्रशासकीय अधिकार श्रीरंग घोलप यांनी सांगितले.