मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार तत्पर, मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा

uddhav thackrey

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कान्फरन्सींगद्वारे मराठवाड्यातील जनतेशी संवाद साधला. लवकरात लवकर मराठवाड्याला कोरोनामुक्त करु असाही संकल्प त्यांनी केला आहे. या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादसाठी मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण स्थापण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आणि राज्य सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमी तत्पर व कटिबद्ध राहील असं आश्वासनही दिले आहे.

मराठवाडा लढणाऱ्यांची भूमी आहे. अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवणे हे मराठवाड्याचे वैशिष्ट्य आहे. मुक्तिसंग्रामसाठी अबालवृध्दांनी योगदान दिले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक जण या मुक्ती लढ्यात सहभागी झाले. त्या सर्वांना मी वंदन करतो, असा उल्लेख त्यांनी केला. मुक्ती लढ्यात सहभागी झालेल्यांचा वारसा सांगणारी आजची पिढी आहे. आपले मराठवाड्याशी, औरंगाबादशी वेगळे नाते आहे, भावनात्मक नात्याची आपली जवळीक आहे असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख करून केला. हैदराबाद मुक्तिसंग्रामचा लढा विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ द्यायचा नाही,

मुक्ती लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीला सांगायचा आहे आणि त्यासाठी सिध्दार्थ उद्यानाच्या परिसरात मुक्तिसंग्राम संग्रहालय उभारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडा चिवट आणि जिद्दी आहे असे सांगताना ते म्हणाले, विकासाच्या दिशेने मराठवाड्याची वाटचाल सुरू आहे, पण त्यात काही अडचणी आहेत. मराठवाडा भविष्यात दुष्काळग्रस्त होऊ नये याची खबरदारी, जबाबदारी आम्ही घेतलीआहे. समृध्दी महामार्ग झाल्यावर मराठवाडा समृध्द होईल असा उल्लेख करून ते म्हणाले.

मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन केले जाईल. या प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी सूचना त्यांनी केली. यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. देसाई यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले, त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय , पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील आदींची विशेष उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या :