पहा कसा होणार मुंडेच्या मतदारसंघात शरद पवारांचा वाढदिवस

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे 12 ते 18 डिसेंबरदरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार आहे. गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या मराठी गझलांच्या बहारदार कार्यक्रमांसह विविध स्पर्धा, शिबिर, वृक्षसंवर्धन व संगोपन, श्रमदानातून जलसंधारण, गरजूंसाठी साहित्य वितरण आदी विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे. प्रभू वैद्यनाथास अभिषेक व विविध धार्मिक स्थळांवर पूजा, प्रार्थना व महापुरुषांना अभिवादन करण्यात येईल. गुरुवारी भीमराव पांचाळे यांच्या गझलांच्या कार्यक्रम होईल.

शुक्रवारी (ता. 13) मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर, मोफत मधुमेह व रक्तदाब शिबिर होईल. 1100 लाभार्थींना शिधापत्रिका वितरण, विविध क्षेत्रांतील कामगारांना एक लाख रुपये विमा संरक्षणाचा लाभ देण्यात येईल. दिव्यांगांना मोफत व्हिलचेअरचे वितरण होणार आहे. शनिवारी (ता. 14) खुल्या डे-नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरवात होईल. रविवारी (ता. 15) रन फॉर हेल्थ रन फॉर ग्रीन परळी या मॅरेथॉन स्पर्धा होईल. सोमवारी (ता. 16) चांदापूर रोडवरील घनशी नदीचे खोलीकरण व सरळीकरण करून नदी पुनरुज्जीवित करण्यास सुरवात करण्यात येईल. मंगळवारी (ता. 17) युवतींसाठी आत्मसुरक्षा शिबिराची सुरवात होईल. बुधवारी (ता. 18) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व परिसरात सुशोभीकरण उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्नेहनगरमधील खुल्या जागेत ट्री-गार्डनसह वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

स्वाभिमान सप्ताहामधील विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; तसेच अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या