सत्ता स्थापनेचा संघर्ष : संदीप देशपांडे म्हणताहेत ‘शुभमंगल सावधान’

Uddhav-Thackeray-Devendra

टीम महाराष्ट्र देशा : भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसंच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध असल्याने चर्चा लांबणीवर पडत होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील जोपर्यंत काँग्रेसकडून होकार येत नाही तोपर्यंत शिवसेनेला पाठिंबा दर्शवणार नाही सांगितलं होतं. यामुळे काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान,आता राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे.

तर दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंट वरून त्यांनी एक पोस्ट केली असून संभाव्य महाशिवआघाडीवर तोफ डागली आहे. “आपण जेव्हा लग्न करतो. तेव्हा सुद्धा पत्रिका बघतो. त्यावेळी ३६ गुण जुळतात का? किंवा त्यापूर्वी आपले विचार जुळतात का? हे बघतो. मात्र आता इथे असे काहीही राहिलेले नाही. फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्न करायची घाई सुरु आहे. त्यामुळे जे लग्नात सर्व ठिकाणी ‘शुभमंगल सावधान’ म्हणतात, तेच आजही म्हणावसं वाटत आहे.” असे संदीप देशपांडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या