fbpx

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी केलं विविध विकास कामाचं उद्घाटन

श्रीनगर : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांच्या हस्ते शनिवारी राज्यातील ३३० मेगावॅट क्षमतेच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्याच्या प्रगतीवर थेट पंतप्रधान कार्यालयातून लक्ष ठेवले जात होते. तसेच शेर-ए-कश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे श्रीनगर रिंग रोड (बाह्य़वळण रस्ता) प्रकल्पाची कोनशिला देखील ठेवण्यात आली.

श्रीनगर शहराला वळसा घालून जाणारा हा ४२.१ किमी लांबीचा रस्ता पश्चिमेकडील गलंदर आणि बंदिपुरा जिल्ह्यातील सुंबल या ठिकाणांना जोडणार असून त्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या दौऱ्यात मोदी राज्याच्या जम्मू, काश्मीर आणि लडाख या तिन्ही प्रदेशांना भेट देत आहेत. मोदींनी झोझिला बोगद्याच्या बांधकामाचीही कोनशिला ठेवली. हा बोगदा काश्मीर खोरे आणि लडाख या प्रदेशांना जोडणार आहे. सध्या हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे दोन्ही प्रदेशांचा संपर्क तुटतो. दरम्यान या बोगद्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.

दरम्यान दिशाभूल झालेल्या तरुणांनी उचललेला प्रत्येक दगड किंवा शस्त्र हा जम्मू-काश्मीरच्या स्थैर्यावरील आघात आहे. तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून राष्ट्रीय मुख्य प्रवाहात येणे हेच हितावह असल्याचं आव्हान देखील यावेळी मोदींनी केले.