नरेंद्र मोदींकडून कुमारस्वामी यांचे अभिनंदन

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत सिद्ध न करता आल्याने कर्नाटकातील भाजपचे नेते येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान कर्नाटकातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अखेर काल जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.या शपथविधीला देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन कुमारस्वामी आणि परमेश्वर यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, बसपा सुप्रीमो मायावती, तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, सीपीएमचे नेते सिताराम येचुरी, जनता दल युनायटेडचे शरद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.