गौरी म्हणते, “यू कॅन डू इट”

टीम महाराष्ट्र देशा : गौरी गाडगीळ या मुलीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर तयार झालेला ‘यलो’ हा चित्रपट पाहण्याचा व तिला पाहण्याचा, तिला ऐकण्याचा दुर्मिळ योग लातूरकर रसिक प्रेक्षकांना रविवारी आला. तुम्ही करू शकता “यू कॅन डू इट” असा संदेश देत, गौरीने प्रेक्षकांशी संवाद साधला. तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत तिचे कौतुक केले.

‘स्वर’, ‘अंतरंग’ या सेवाभावी संस्थांनी अभिजात फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने लातूरला दोनदिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. याचा समारोप रविवारी झाला. पहिल्या दिवशी डॉ. मोहन आगाशे निर्मित ‘कासव’, ‘अस्तू’, हे दोन आशयघन चित्रपट दाखवण्यात आले. रविवारी सकाळी ‘बाधा’ आणि दुपारी अभिनेता रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर निर्मित ‘यलो’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये, कलाकार गौरी गाडगीळ आणि गौरीची आई स्नेहा गाडगीळ यांनी चर्चासत्रात रसिक प्रेक्षकांशी तासभर संवाद साधला. रविवार सुटीचा दिवस असल्याने गौरीला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली. गर्दीने दयानंद सभागृह खचाखच भरून गेले होते.

गौरीची आई स्नेहा गाडगीळ यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना ज्या वयात घडायचं असतं, पुढे जायचं असतं, त्या वयात मुलं सोशल मीडिया, इंटरनेट आदीच्या मागे लागून नको त्या गोष्टी करण्याकडे धजावत आहेत. यापेक्षा त्यांनी जगण्याच्या वाटा चोखाळल्या पाहिजेत. हल्लीची पिढी जगण्याचा मार्ग चुकत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

स्वतःच्या आयुष्यावरील चित्रपटात स्वतःच भूमिका करणारी गौरी ही देशातील एकमेव असल्याचे दिग्दर्शक महेश लिमये यांनी सांगितले. गौरीची जिद्द पाहून आपण निःशब्द झालो. असा चित्रपट तयार करणे आणि प्रेक्षकांनी त्याला स्वीकारणे, खूप कठीण असते. गौरीमध्ये झालेले बदल अमेझिंग आहेत असे ते म्हणाले. चित्रपट महोत्सवाच्या संयोजनाबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी आपली भूमिका विशद केली. अभिजात फिल्म सोसायटीचे श्याम जैन यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...