राज्य शिक्षण मंडळ आणि परीक्षा परिषदेत नवीन अधिकारी पदभार स्वीकारणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी कोकण विभागाच्या विभागीय अध्यक्ष शकुंतला काळे यांची आणि राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोविंद जगताप यांची गुरुवारी नियुक्ती झाली आहे. हे दोन्ही अधिकारी येत्या सोमवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचा अतिरिक्त कार्यभार गेले अनेक दिवस माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे यांच्याकडे होता. तर राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी दिनकर पाटील काम करत होते. शासनाने तीन सहसंचालकांना संचालकपदी बढती देऊन संबंधित विभागांची जबाबदारी दिली आहे.नूतन अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या, कोकण विभागाच्या अध्यक्षपदी
गेल्या दोन वर्षांपासून काम केले आहे. त्यामुळे मंडळाच्या कामाचा अनुभव आहे. कोकण विभागात विविध प्रयोग केले आहेत. त्यातूनच कॉपीमुक्त कोकण हा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे मेळावे घेऊन या सर्वांचे उद्बोधन केले; त्याचा बोर्डाला देखील लाभ झाला. आता संपूर्ण राज्याची जबाबदारी मिळाली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर पुढील कामाची दिशा ठरवणार आहे. तर परीक्षा परिषदेचे नूतन अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले, बोर्ड आणि
परीक्षा परिषद या दोन्हींचे काम परीक्षा घेणे हेच आहे. राज्य परीक्षा परिषदेचे कामकाज समजून घेऊन कामाला सुरुवात करणार आहे. काम करत असताना प्रत्येक ठिकाणी अडचणी असतात त्यावर योग्य तो मार्ग काढून पुढे जाणार आहे. येत्या सोमवारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहे.

You might also like
Comments
Loading...