‘निपाह’ विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही – दीपक सावंत

sawant-deepak

मुंबई : केरळमध्ये उद्भवलेल्या  ‘निपाह’ विषाणूच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही, पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना सूचित करण्यात आले आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष (isolation ward) सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालयात डॉ. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात या आजारासंदर्भात घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजीवकुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, रुग्णालये, डॉक्टर तसेच नर्सेस यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे. ‘निपाह’ विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेकुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. विशेषत: केरळ भागातून प्रवास करुन आलेल्या व्यक्तींमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. खासगी रुग्णालयातही अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास त्याबाबत तातडीने सरकारी रुग्णालयास सूचित करण्यात यावे व सरकारी रुग्णालयात यासाठी सुरु असलेल्या विलगीकरण कक्षात (isolation ward) या रुग्णांना दाखल करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.