करमाळा : ऊसतोडीसाठी आलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सोलापूर (प्रतिनिधी):- करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात ऊसतोडीसाठी आलेल्या एका दाम्पत्याची अल्पवयीन मुलगी मोकळ्या रानात शौचासाठी गेली असता तिच्यावर अज्ञातांनी अत्याचार करून तिला मारहाण करून जखमी अवस्थेत शेतातील उसाच्या फडात टाकून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात ऊसतोडीसाठी जिल्ह्याच्या बाहेरून ऊसतोडी करणाऱ्या कामगारांची टोळी आली असून त्यातील एक टोळी करमाळा तालुक्यातील  वांगी गावात राहात होते. त्या टोळीतील एका दाम्पत्यांची मुलगी सोमवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी शौचालयासाठी मोकळ्या रानात गेली असताना तिच्यावर त्या शिवारात असलेल्या अज्ञातांनी शारीरीक अत्याचार केला त्यानंतर तिने कोणाकडे तक्रार करूनये यासाठी तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डो्नयात दगड घातले त्यात ती गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेतच तिला बाजूच्याच फडात टाकून नराधमांनी पळ काढला.

तिला जखमी अवस्थेत तिच्या वडीलांनी तात्पुरता उपचार करून तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्या जखमी अल्पवयीन मुलीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत अद्याप करमाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली नसली तरी पोलीस तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने करमाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच त्या नराधमांबाबत राग व्यक्त होत असून ताबडतोब अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे.

1 Comment

Click here to post a comment