येडियुरप्पा देणार राजीनामा; तेरा पानी राजीनामा पत्र तयार?

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान असणार आहे.

कर्नाटकमधील २२२ जागांपैकी भाजपा १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाने ३७ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती करत भाजपाला शह दिला आहे. भाजपला बहुमतासाठी आणखी ८ जागांची आवश्यकता आहे.

मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या ८ आमदारांचा पाठींबा मिळवणे भाजपसाठी सोपे नसणारे. या सर्व शक्यतांचा विचार करत बी. एस. येडियुरप्पा हे राजीनामा देणार असल्याचं वृत्त आहे. येडियुरप्पा यांनी आपला तेरापानी राजीनामा पत्र देखील तयार केलं आहे. याबाबत टीव्ही ९ कन्नडाने माहिती दिली. या वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार येडियुरप्पा राजीनामा देण्याच्या तयारीत असून, ते ऐनवेळेस राजीनामा देण्याची शक्यता आहे.