भाजपकडून आमचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न – कॉंग्रेस

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.

मात्र त्यापूर्वी कॉंग्रेसकडून एक ऑडियो क्लिप जारी करण्यात आली आहे. या ऑडियो क्लिपच्या आधारे भाजप आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपा नेते जर्नादन रेड्डी यांनी काँग्रेसच्या एका आमदाराला लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला. हा आरोप सिद्ध करण्यासाठीच ही सीडी जारी करण्यात आली आहे.

जनार्दन रेड्डी आणि बेल्लारी रेड्डी हे दोघेही रेड्डी ब्रदर्स या नावे ओळखल्या जाणाऱ्या तीन भावांपैकी आहेत. बेकायदा खाणकाम प्रकरणी या दोघांनाही शिक्षा झाली होती. या दोघांचे भाऊ करुणाकर रेड्डी आणि सोमशेखर रेड्डी या दोघांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवत आपल्या जागा जिंकल्या आहेत. आता या रेड्डी ब्रदर्सपैकी जनार्दन रेड्डी यांनी काँग्रेस आमदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.