राम शिंदेंचा गड शाबूत; कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा भैलुमे यांची निवड

Ram-Shinde-

अहमदनगर/प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागत असताना भाजप नेते जलसंधारणमंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत कोणताही आश्चर्यकारक निकाल न लागता कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्याच प्रतिभा भैलुमे यांची, तर उपनगराध्यक्षपदी मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची बिनविरोध निवड झाली. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या बैठकित ह्या निवडी झाल्या. कर्जत नगरपंचायत मधील सतरा सदस्यांपैकी सोळा नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे सोमनाथ कुलथे हे नगरसेवक मात्र काही कारणास्तव अनुपस्थित राहिले.

अहमदनगर मधील पारनेर येथील नगरपंचायत मध्ये विद्यमान शिवसेना आमदार विजय औटी यांना धक्का देत अपक्ष नगरसेविका वर्षा शंकर नगरे यांनी आमदार औटी विरोधी नगरसेवक व शिवसेना बंडखोर नगरसेवक यांना बरोबर घेत पारनेर नगरपंचायत मध्ये आमदार औटी यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावत त्यांना स्वतःच्याच होम पिचवर धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत मध्ये काही करिष्मा घडतो की काय असे वाटत होते. परंतु नगरपंचायत नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने व त्यासाठी भाजपच्या नगरसेविका प्रतिभा भैलुमे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची नगराध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली.

परंतु उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने १३ नगरसेवक समवेत बरोबर घेत मावळते नगराध्यक्ष नामदेव राउत, तर कॉंग्रेसच्या वतीने पक्षाचे चार नगरसेवक समवेत घेत मोनाली तोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणुकीत काही काळ रंगत आली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे अर्ज माघारी घेण्याच्या अर्धा तास अगोदर मोनाली तोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे नगराध्यक्षपदी प्रतिभा भैलुमे व उपनगराध्यक्षपदी नामदेव राउत यांची निवड जाहीर करण्यात आली . निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जलसंधारणमंत्री व अहमदनगर पालकमंत्री प्रा.राम शिंदे व भाजपा नेत्यांनी अभिनंदन केले आहे.