मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शक्कल ; घंटागाडीच्या सहाय्याने करणार मतदार जागृती

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सुमारे साडे चारशे घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वीप उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमासाठी जिल्हा समितीचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली आहे. डॉ. भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्वीप कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा मतदारसंघात यापूर्वी सुमारे साठ टक्केच्या आसपास मतदान झाले आहे. मतदानाची ही टक्केवारी वाढायला हवी. त्यासाठी समाजातील सर्व घटकांतील लोकांनी मतदान केले पाहिजे. त्यासाठी मतदान जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, शपथ नाट्य, पत्रलेखन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

सोलापूर महानगरपालिका, जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती केली जाणार आहे. आज झालेल्या बैठकीस स्वीप समितीचे सह अध्यक्ष अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, देवदत्त गिरी, महापालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, शिक्षणाधिकारी संजय राठोड, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.