लग्न समारंभासाठी औरंगाबाद महापालिकेचे नवे फर्मान

औरंगाबाद : शासन निर्देशानुसार औरंगाबाद शहरात आता बंद हॉल, सभागृहांमध्ये होणारे सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विवाह समारंभांना केवळ ५० व्यक्तींच्याच उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या नियमांचे पालन न करणार्‍या संबंधित संस्था, समित्या व मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कडक तथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (दि.२२) जारी केले.

औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. मागील सहा दिवसांतच नव्याने आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या ही नऊशेच्या घरात गेली आहे. आठवडाभरापूर्वी रोजचे २० ते ३० नवीन कोरोना रूग्ण आढळत होते. मात्र मागील सहा दिवसांपासून नव्याने आढळलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येने तीन अंकी संख्या पार केली आहे. विशेष म्हणजे रविवारी तर जिल्ह्यात तब्बल २०१ रूग्ण नव्याने आढळले. विशेष म्हणजे यात महापालिका हद्दीतच १८४ रूग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवरच राज्यातील अधिकचे कोरोना रूग्ण आढळणार्‍या शहरांत सर्व प्रकारचे कार्यक्रम, मोर्चे यांना उपस्थितीबाबत मर्यादा घालून देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी संबंधित आदेश जारी केले आहे. या आदेशात म्हटले आहे की, शासन निर्देशानुसार शहरात बंद हॉल तथा मंगल कार्यालये, सभागृह यांत होणारे सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विवाह समारंभांना केवळ ५० व्यक्तींच्याच उपस्थितीची मर्यादा अनुज्ञेय राहील.

तर खुली मैदाने, खुल्या जागांवरील समारंभास क्षेत्रफळानुसार ५० व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्यात येईल. यासाठी संबंधित भागातील पोलीस ठाणे व पालिकेच्या प्रभाग कार्यालयाची संबंधितांना परवागनी घेणे अनिवार्य राहील.

महत्त्वाच्या बातम्या