रमेश कराड याचं काय करायचं ते निवडणुकीनंतर बघू – धनंजय मुंडे

लातूर – रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे. काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने कराड यांना लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघातून  उमदेवारी दिली होती. रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे या मतदार संघातील उमेदवार असणार आहेत.

विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड सध्या राष्ट्रवादीतच आहेत. पक्ष त्यांच्याबाबत विधानपरिषद निवडणुकीनंतर योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना विधानपरिषदेचं तिकीटही देण्यात आलं. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.