प्रणव मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्याने काँग्रेसकडून निषेध

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी सात जून रोजी मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संघाच्या नागपूरमधील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान प्रणव मुखर्जी यांनी संघाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र आता मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मी मुखर्जी यांच्या जागी असतो तर संघाचे हे निमंत्रण कधीही स्वीकारले नसते. तसेच मी संघाला सांगितले असते की, त्यांचा दृष्टिकोन व विचारधारा चूक आहे, असं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे.

तसेच माजी रेल्वेमंत्री सी. के. जाफर शरीफ यांनी मुखर्जी यांच्या निर्णयावर जोरदार टीका करत, त्यांचा निर्णय काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध असल्याचे सांगून, आपण या निर्णयाचा निषेध करतो असं म्हंटलं आहे. तर केरळमधील माजी खासदार रमेश चेन्निथला म्हणाले की, मी मुखर्जी यांना पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करावा व संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असे म्हटले आहे. तसेच प्रणव मुखर्जी ज्या कार्यक्रमाला जात आहे तो एका धार्मिक कार्यक्रम असल्याचेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.