fbpx

विसर्जन मिरवणुकीत राडा घालणाऱ्या ‘या’ नगरसेवकाला यापूर्वी देखील झाली होती अटक

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घातल्याबद्दल आणि मारहाण केल्याबद्दल काॅंग्रेसच्या नगरसेवकाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक अविनाश बागवे असं या नगरसेवकाचे नाव असून तो माजी गृहराज्य मंत्री आणि पुणे शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा आहे. बागवे यांना पहिल्यांदाच अटक झाली आहे असं नाही तर यापूर्वी २०१२ साली सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देखील अटक करण्यात आली होती .

बागवे यांनी चिथावणी दिल्यानंतर काल गणेश विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्टरचा चालक आणि साऊंड सिस्टिमचा मालक यांना मारहाण करण्यात आली. चप्पल, शूज, दगड हे मिरवणुकीच्या दिशेने या कार्यकर्त्यांनी फेकले. या सगळ्या प्रकारात गणेशमूर्तीची विटंबना झाल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. थोड्यावेळापूर्वी त्यांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान यापूर्वी २०१२ साली कासेवाडी येथून महापालिकेची निवडणूक लढविणारे अविनाश यांंची मतदानाच्या दिवशी कासेवाडीतील ‘एसआरए’ इमारतीच्या आवारातच असणाऱ्या मतदान केंदावर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी वादावादी झाली होती. मतदान केंद्राच्या आवारात आपल्या कार्यर्कत्यांसह असणारे अविनाश यांना केंदापासून शंभर मीटरच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. अविनाश यांनी जाण्यास विरोध करत असतानाच पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर तेथे आलेले सहायक पोलिस आयुक्त रणजित धुयेर् यांनी अविनाश यांना धक्के मारत बाहेर काढले होते.

या प्रकरणी खडक पोलिस स्टेशनमध्ये अविनाश आणि त्यांच्या कार्यर्कत्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक देखील करण्यात आली होती.