अंधश्रद्धा : डाव्या आणि उजव्या

एकादशी आणि दुप्पट खाशी
एकादशी चे मुळात दोन प्रकार आहेत : कृष्ण एकादशी आणि शुक्ल एकादशी . या दोन्ही एकादशी खगोलीय परिमाणानुसार पूर्णपणे वेगळ्या आहेत . यापैकी कोणत्या एकादशी ला यान सोडले तर ते चंद्रावर पोहोचेल ? असो .

भारतात जेव्हा एकादशी असते तेव्हा अमेरिकेत एकादशी नसते . मुळात भारत आणि अमेरिकेची तारीख आणि वेळच वेगळी असते. त्यात साधारण एक दिवसाचा फरक येतो . मग भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडले तर – ते इंडियन स्टयांडर्ड टाइम नुसार की अमेरिकन प्रमाण वेळे नुसार ? तेही असो !

त्यातून भारतीय कालगणेत आणि पंचांगाच्या गणितात – खूप चुका आहेत . त्या चुका सुधारायच्या एका प्रयत्नाला टिळक पंचाग असेही म्हणतात ! लोकमान्य टिळकांचे पंचांग गणितीदृष्ट्या अधिक अचूक आहे . गणितज्ञ टिळकांनी ज्योतिषांना खरे गणिती पंचांग स्वीकारायचे आवाहन केले होते – पण धर्मशास्त्र आडवे आले ! आज पंचांगात जसे दिलेले असते तसे आकाशात मुळीच नसते. टिळक पंचांग ग्रहांच्या जागा अधिक अचूक सांगते . मग टिळक पंचागानुसार चांद्रयान सोडायचे की पारंपारिक पंचागानुसार ? तर तेही असो .

अमेरिकेची पहिली चांद्रमोहीम Surveyor 1. त्यादिवशी तिथे एकादशी असली तर फक्त पहिल्याच मोहिमेला ती पुरते का ? इतर देशाच्या इतर मोहिमा कधी झाल्या ? असोच असो !

अमेरिकेचे प्रसिद्ध चांद्रयान अपोलो 11. हे यान 16 जुलै 1969 ला चंद्राकडे जाण्यासाठी उडाले ; त्या दिवशी तिथी होती आषाढ शुक्ल द्वितीया. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले 20 जुलैला (तिथी षष्ठी). अपोलो-11 माघारी आले 24 जुलैला. त्या दिवशी तिथी होती दशमी.या सगळ्यात एकादशी कुणी आणली ??? तरी तेही असोच असो.

मी एकादशीला साबुदाणे वडे खातो , बटाट्याची भाजी खातो, दाण्याची आमटी, वरीचा भात खाऊन ; तंगड्या वर करून झोपतो तो चंद्र मावळेपर्यंत . आमचा चंद्र साबुदाण्यात आहे . बरं हा साबुदाणा आणि बटाटा सुद्धा भारतीय नव्हे बरं . तो पोर्तुगीजानी भारतात आणला . आपल्याला काय त्याचे ? खावे प्यावे मजा करावी . कुणी नासाला पंचांग शिकवूदे नायतर डार्विनला उत्क्रान्ती शिकवूदे ! याने विज्ञान बदलत नाही . बोलणार्याची समज कळते.

गणपतीची प्लास्टिक सर्जरी , आंब्याने पोरे होणे , डार्विनचे माकड होणे , एकादशीला चांद्रयान उडवणे या अंधश्रद्धा आहेत यात शंका नाही .पण …..ईव्हीएम हयाकिंग , अर्थकारणातला मार्क्सवाद , सर्व धर्म समभाव या सुद्धा उघडच अंधश्रद्धा आहेत . जगभरातले तज्ज्ञ या दोन्ही प्रकारच्या डाव्या / उजव्या अंधश्रद्धांना हास्यास्पद ठरवत असतात.रामायणात विमाने होती ही जशी अंधश्रद्धा आहे तशीच अशोक काळात समता होती ही सुद्धा अंधश्रद्धा आहे .

उजव्या अंधश्रद्धा बाळगणारे लोक प्रामुख्याने अल्पशिक्षित आहेत . डाव्या अंधश्रद्धा बाळगल्या बद्दल जेएनयू मधून पीएचडी मिळत असते . उजव्या अंधश्रद्धा भारतीय संस्कृतीच्या प्रेमातून ( आणि त्यात काय भारी नसल्याच्या ) वैफल्यातून आल्या आहेत . तर डाव्या अंधश्रद्धा हा सिस्टिमिक राजकीय प्रचाराचा भाग आहे . उजव्या अंधश्रद्धा या मुख्यतः इतिहासाबद्दल आहेत आणि डाव्या अंधश्रद्धा या मुख्यतः भविष्या बद्दल आहेत . खरी गोम इथेच आहे . ऐतिहासिक अंधश्रद्धा फार तर बौद्धिक नुकसान करतात . भविष्यात अराजक माजवायची क्षमता डाव्या अंधश्रध्दांत आहे .

जगातल्या डझनभर देशाना भुकेकंगाल बनवणारा मार्क्सवाद हवा आहे ? अविश्वास आणि अराजक उदभवणारे इव्हिम विरोधी भाष्य हवे आहे ? ईव्हीएम ह्याक करणे आणि इस्त्री ह्याक करणे यात काही फरक नाही -दोन्ही बालवाडी समज आहेत . पण निवडणूक आणि लोकशाही विषयीच प्रश्नचिन्ह उभे करणारा ईव्हीएम वाला डावा प्रचार हवा आहे ? सगळे धर्म सारखे नसतात . ते परस्पर विरोधी असतात . काही धर्म काफिरांविरुद्ध जिहाद करायला शिकवतात . याकडे संपूर्ण कानाडोळा करणारा सर्व धर्म समभाव हवा आहे ?असे प्रश्न पडतात . तेव्हा उजव्या अंधश्रद्धा या तुलनेने कमी घातक , कमी हिंसक आहेत . तर डाव्या अंधश्रद्धा अधिक सर्वव्यापी आणि मानवतेला जास्त धोकादायक आहेत असे वाटते.                                                                                                                                                                                                                       – डॉ. अभिराम दीक्षित