भाजप विरोधात राष्ट्रवादीसह अन्य समविचारी पक्षांना बरोबर घेऊ – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : देशातील व राज्यातील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असल्याने भाजप सरकार विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीसह अन्य समविचारी पक्षांना बरोबर घेणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

तसेच आम्ही राजीनामे देऊ अशी पोकळ धमकी देणाऱ्या शिवसेनेचे सत्तेून बाहेर पडण्याबाबत बोलण्याचे द्विशतक झाले असून शिवसेनेने खिशात ठेवलेले राजीनामे पावसात भिजले का? फाटून गेले अशी खोचक टीका त्यांनी केली. अहमदनगर जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते. याचबरोबर देश पातळीवर भाजपा विरुद्ध रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसून निर्णय घेतील असेही विखे पाटलांनी सांगितले.

कर्नाटकात जे घडले त्याबद्दल तेथील राज्यपालांना बडतर्फ करावे किंवा नीतिमत्तेच्या आधारे त्यांनी राजीनामा द्यावा, तसेच आता देशात व राज्यात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशात नक्कीच परिवर्तन घडवून सत्ता खेचून आणतील असा आशावाद विखे पाटलांनी व्यक्त केला. त्याचबरोबर देशात विरोधी पक्ष एकत्र येत असून भाजप विरोधात महाराष्ट्रातही सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण योग्य भूमिका बजावणार असून त्यात माझी नेहमीच समन्वयकाची भूमिका असेल असेही विखे पाटील म्हणाले.

कर्नाटक मधील घडामोडींवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, संविधानाची भाषा बोलणाऱ्या भाजपला कर्नाटकातून चांगली चपराक बसली आहे, भाजपा केंद्रातील सत्ता व प्रचंड पैशाच्या आधारावर सत्ता स्थापन करू पाहत होते परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांना चांगलीच चपराक बसली आहे. लोकशाहीच्या मंदिरात असा लाजिरवाणा प्रकार घडता कामा नये, यामूळे देशातील जनतेला भाजपाचा असली चेहरा काय आहे हे दिसले असून आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही व हा लोकशाहीचा विजय आहे असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला.

तसेच अहमदनगर मधील केडगावची घटना ही वैयक्तिक वादातून झाल्याचा त्यांनी पुनरूउच्चार केला, याबरोबर जिल्हा काँग्रेसमध्ये मरगळ आल्याबाबत त्यांना विचारले असता तसे काही नाही, असे सांगून यावर विखे पाटलांनी अधिक बोलणे टाळले. जिल्ह्याला प्रभारी जिल्हाध्यक्षपद देण्यात आलेआहे, असे त्यांनी सांगितले व कायम जिल्हाध्यक्ष पदाबाबत तो निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील असे विखे पाटील म्हणाले. याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील वाळू तस्कर व महसूल प्रशासनातील संबंधावर आंध्रप्रदेश सरकारचे जे वाळूबाबत धोरण आहे. ते धोरण महाराष्ट्र सरकारने घ्यावे यामुळे या प्रकाराला आळा बसेल अशी मागणी देखील त्यांनी केली.