सर्वसामान्यांना दिलासा; अखेर १७ व्या दिवशी पेट्रोल – डिझेल झाले स्वस्त

मुंबई : वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. १६ दिवसानंतर आज अखेर पेट्रोल ६० पैसे तर डिझेल ५६ पैशांनी स्वस्त झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल – डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर पेट्रोलचे दर गगनाला भिडले.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून देशभरात सरकारवर टीकेची झोड उठत असतानाही, तब्बल १६ दिवस पेट्रोल – डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होतं होती. मात्र आज १७ व्या दिवशी अखेर पेट्रोल ६० पैसे तर डिझेल ५६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

आज दिल्लीत पेट्रोल ७७ रूपये ८३ पैसे प्रति लिटर तर डिझेल ६८ रूपये ७५ पैसे प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल ८५.६५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ७३.२० रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान मंगळवारी लखनऊ येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. तसेच इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं देखील ते म्हणाले होते.