मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु; अशोक चव्हाणांनी दिली माहिती

अशोक चव्हाण

मुंबई : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३६ ठिकाणी वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 14 ठिकाणी वसतीगृहासाठी इमारती तयार असून त्याचे लवकरच उद्घाटन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतीगृहांचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यासंदर्भात जागा उपलब्धतेसाठी महसूल मंत्री हे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.

तसेच सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, ‘मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु करण्याची सर्व पूर्तता झाली असून येत्या १५ ऑगस्टला त्यांचे उद्घाटन करण्याचा मानस आहे. तसेच सारथीची ८ कार्यालये उभारण्याचा निर्णय आधीच झाला असून जागेच्या संदर्भात काही अडचण असल्यास महसूलमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन तो विषय सोडवला जाईल’ असे ते म्हणले.

दरम्यान, मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रलंबित विषयांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या