…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे

सिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही. महागाई सारख्या गंभीर विषयावर आजपर्यंत त्यांनी एक शब्दसुद्धा काढलेला नाही. असा घणाघात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेस परिवर्तन निर्धार यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत आहे. यावेळी सिन्नर येथे मुंडे बोलत होते.

शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना धनंजय मुंडे म्हणले की, कांदा उत्पादक शेतकरी आज ढसाढसा रडत आहे. आंदोलनं करत आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये केलेल्या चूकीबद्दल बॅनर लावून पवार साहेबांची माफी मागत आहे. त्यांच्या मालाला आज भाव नाही. दोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का? असा प्रश्नही यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला.

नाशिकचं नावलौकीक करणाऱ्या भुजबळ यांना सरकारने कटकारस्थान करून अडकवले. त्याकाळात जर भुजबळ साहेब राजकारणात सक्रीय असते तर भाजपाचं आज अस्तित्वच नसतं. सात महिने झाले अजून भुजबळ यांच्या छातीत का दुखत नाही, असा मेसेज भाजपाच्या सोशल मीडिया गोटातून वायरल होत आहे. ही अंत्यत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणाची इतकी खालची पातळी कोणी गाठली नव्हती, असेही मुंडे यावेळी म्हणले.