fbpx

शेतक-यांनी ठोकले नेवासा महावितरणच्या कार्यालयाला टाळे

newasa-tale

नेवासा / भागवत दाभाडे: तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने बुधवारी संतप्त शेतक-यांनी नेवासा येथील बसस्थानक जवळील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. वीज प्रश्नावर तालुक्यात आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या रब्बी हंगाम सुरु असून ऐन पीक उभारणीच्या काळात महावितरणकडून शेतक-यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. नेवासा तालुक्यातील शेतक-यांना वेळेवर वीज बिले देण्यात आलेली नाहीत तसेच पूर्व सूचना न देता अचानकपणे सब स्टेशनमधून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून २०० ते २५० रोहित्र बंद करण्यात आली आहेत. काही ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही़ त्यामुळे महावितरण विरोधात नाराजीचा सूर आहे. बाळासाहेब क्षीरसागर, महेश निपुंगे, अविनाश सरोदे, रामेश्वर चावरे, अशोक शिंदे, बाळासाहेब शिंदे, राजू शिंदे, लक्ष्मण शिंदे, भाऊराव नागरे, पोपट शेकडे, दत्ता निकम, रमेश गवांदे, किरण खाटीक, दत्तात्रय मते, प्रकाश धनवटे आदी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांऐवजी माझ्यावर गुन्हे दाखल करा- आमदार बाळासाहेब मुरकुटे

मानवतेच्या दृष्टिकोनातून जनावरे व शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील सर्व कृषीपंपाना रोज किमान तासभर वीज द्यावी अन्यथा शेकाऱ्यांऐवजी माझ्यावर गुन्हे दाखल करा
आमदार बाळासाहेब मुरकुटे

वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही- उपअभियंता बडे

शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे यासाठी वीज पुरवठा खंडित केला जातो.पाण्यासाठी तासभर विज सोडावी असे शेतकरी म्हणतात परंतु वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.
भाऊसाहेब बडे उपकार्यकारी अभियंता, महावितरण