राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमधून हद्दपार करण्याचे काम मतदार या निवडणुकीत करतील : नेवाळे

टीम महाराष्ट्र देशा : मावळ विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड झाली असल्याचं वृत्त आलं आहे. कारण कात्रज दुध संघाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे आणि दत्ता शेवाळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे. बाळासाहेब नेवाळे हे मावळ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र पक्षाने सलग दोनदा उमेदवारी डावल्याने नाराज नेवाळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही धोरण राहिलेले नाही. केवळ पैशाचे जीवावर भाजपने टाकून दिलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यात उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळ मधून हद्दपार करण्याचे काम मतदार या निवडणुकीत करतील, असे मत पक्षांतर केल्यानंतर नेवाळे यांनी व्यक्त केले. राजकारणात प्रामाणिक लोक कमी असून मुख्यमंत्री हे पारदर्शक काम करत असल्याने विरोधक त्यांच्यावर टीका करत नाही, असेही नेवाळे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मावळ विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी बाळासाहेब नेवाळे हे व्यासपीठावर उपस्थित होते. बाळासाहेब नेवाळे यांनी पक्षांतर केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर नेवाळे यांच्या भाजपात येण्याने भाजप उमेदवार बाळा भेगडे यांची ताकद चांगलीचं वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी नेवाळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर निराशा व्यक्त केली होती. पक्षाशी गेली अनेक वर्ष एकनिष्ठ राहूनही पक्षाने संधी न दिल्याने नेवाळे यांनी राजकारणातून संन्यास घेतला असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता नेवाळे यांनी भाजपात प्रवेश केला असून मावळातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाले असल्याची चर्चा आहे.

मावळातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. महायुती आणि महाआघाडीचे दोन्ही उमेदवार तोडीसतोड असल्याने दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराच्या फेऱ्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात बाळा भेगडे तिसऱ्यांदा नशीब अजमवण्यासाठी उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने मतदारसंघातील चुरस चांगलीच वाढली आहे.