नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली तर अजितदादांना कमीत कमी 200-300 कोटी रॉयल्टी मिळेल; सोमय्यांचा पुन्हा निशाणा

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ मालक हे अजित पवारच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही दाखवली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 200 ते 300 कोटी रॉयल्टी मिळू शकते. यातला सिझन 1 हा अजित पवार असेल, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला. पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे.

27 हजार सभासदांचा जरंडेश्वर कारखाना काढून घेतला. मी तेव्हापासून विचारतोय कारखान्याचा मालक कोण?” असं म्हणत किरीट सोमय्या यांनी कागदपत्रं सादर केली. “उच्च न्यायालयाने जरंडेश्वर कारखाना खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. कारखाना खरेदी करताना अजित पवारांनी सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रिपदी राहता येणार नाही, असं सोमय्या म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता गोळा करण्यासाठी आपल्या बहिणींच्या नावाचा वापर केला. मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटलंय की जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झालाय. त्याची चौकशी झाली पाहिजे असा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिले. जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा घेतला तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. यात राज्य सरकारचे पैसे आहेत. अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला पैसा जातो, असं सोमय्या म्हणाले आहेत.

अजित पवारांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला आणि स्वत:च स्वत:च्या कंपनीला घेतला. सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं. स्वत: घेतला तोही बेनामी घेतला. त्यांनी सगळ्या बाबींचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी पदावर राहता येणार नाही, अशा शब्दात सोमय्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या