धक्कादायक ! पुण्यात उभा राहतोय कृत्रिम डोंगर ; नागरिकांच्या सुरक्षतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथील अग्निशमन केंद्राशेजारील मोकळ्या जागेत ‘सॉलिटअर’ या व्यापारी व गृहप्रकल्पाचे काम चालू आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामाकरिता चालू असलेल्या खोदाईतून निघणारा राडारोडा हा तिथेच अत्यंत धोकादायक पद्धतीने ढिगारा घालून साठवून ठेवण्यात येत आहे. आता या राडारोड्याचे रूपांतर कृत्रिम डोंगरात झाले आहे.

या ढिगाऱ्याच्या डोंगराला लागूनच आनंदनगर वसाहत आहे. त्यामध्ये साधारणपणे दीड ते दोन हजार लोक वास्तव्यास आहेत.त्या सर्व लोकांना सद्यस्थितीत आपला जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. हा ढिगारा कधी पण वस्तीवर कोसळू शकतो यातून मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत.

दरम्यान, महापालीकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश सकपाळ यांनी जून २०१७ मध्ये या खोदाईची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, प्रशासनाने याकडे सपशेल कानाडोळा केला आहे. आता हा कृत्रिम डोंगर कोसळून अपघात झाला तर याला जबादार कोण ? असा सवाल आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिक करत आहे. पुण्यात माळीण सारखी परीस्थिती करण्याचा डाव काही लोक जाणूनबुजून करत असल्याचा आरोप देखील येथील नागरिकांनी केला आहे.

मध्यंतरी पुण्यात मुठा उजवा कालवा फुटून अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. इथे देखील तशीच परिस्थिती उध्भवू शकते. संबंधित विषय हा अत्यंत गंभीर विषय असून याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. जो डोंगर उभा केलेला आहे तो हटवण्याचे आदेश दिले पाहिजेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबत तीव्र आंदोलन उभे करेल आणि त्यानंतरची सगळी जबाबदारी प्रशासनाची असेल असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतीश आप्पा तावरे यांनी दिला आहे.