fbpx

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता : देवेंद्र फडणवीस

पुणे : महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरित केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

श्री. गंधर्व वेद प्रकाशनच्या ‘संतदर्शन चरित्र ग्रंथा’चे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ.सदानंद मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिला. संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणाची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.

संत विचार हे काळसापेक्ष आहेत. प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्त्व आहे. मात्र हे संत विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. संत दर्शन या संतांच्या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे संत विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.

चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. बदणाऱ्या सामाजिक मनोविकासामुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. संतांचे विचार पुढे सुरू राहण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला संत चरित्र ग्रंथांच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: करून घेतला तसेच त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण – देवेंद्र फडणवीस

परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण – देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधांच्या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर; राज्यात गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी – देवेंद्र फडणवीस