कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची, मात्र पालकमंत्री राजकीय फायदा घेण्यात व्यस्त ?

satej patil vs dhananjay mahadik

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर महिन्यातच संपली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर पडल्याने कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेला वेग आला असतानाच पुन्हा एकदा महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत.

अशातच गेली अनेक दशके कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. हद्दवाढीचा मुद्दा रखडल्याने महापालिकेला उत्पन्न वाढीस देखील अनेक अडचणी येत असून मूलभूत गरज देखील पूर्ण करण्यासाठी महापालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे.

जिल्ह्यातील राजकारणामुळे शहराचा विकास मात्र रखडला आहे. ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक संपन्नता, इतर राज्यांच्या सीमांशी असलेली जवळीकता यामुळे शहराचा विकास झपाट्याने होणं अपेक्षित होतं. मात्र शहरातील रस्ते, पाणी, इतर सोयी-सुविधा यांचा अभाव असल्याचं दिसून येतं.

यासंदर्भात भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनेकदा हद्दवाढ झालेल्या पुण्याचा विकास आपल्याला दिसून येतो. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ ही काळाची गरज आहे. मात्र, राजकीय हेतूने ही हद्दवाढ गेली अनेक वर्षे रखडली आहे. मी स्वतः खासदार असताना यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक यांनी देखील अनुकूलता दर्शवली होती.’ असं ते म्हणाले.

मात्र, सद्याच्या पालकमंत्र्यांनी (गृहराज्यमंत्री सतेज पाटील) यामध्ये राजकीय खेळी केली व विरोध केला. लोकांमध्ये देखील तसा प्रसार झाला. सद्या लोकांमध्ये जनजागृती होत आहे. हद्दवाढीची गरज लोकांना समजत आहे. आता विरोध कमी झाल्यास सत्ताधाऱ्यांनी पाठींबा दर्शवणं गरजेचं आहे.’ असं देखील धनंजय महाडिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या