‘नीट’ २०१८ परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर

परीक्षार्थींना त्यांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक

मुंबई : यावर्षी नीट परीक्षा ६ मे रोजी होणार होणार असून परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. परीक्षार्थींना त्यांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक आहे. जर आधार कार्डमधील माहितीत सारखेपणा नसेल तर विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठीचा फॉर्म भरता येणार नाही.

मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कालपासूनच सुरु झाली आहे. ९ मार्चला रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे. रविवार ६ मे रोजी सकाळी १० वाजता ‘नीट’ परीक्षा होईल. सीबीएसईतर्फे दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते.

नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.cbseneet.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल. १४०० रुपये प्रवेश शुल्क (एससी, एसटी उमेदवारांसाठी 750 रुपये) आकारण्यात येईल. डेबिट/क्रेडीट कार्ड, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे हे पेमेंट करता येईल. तसेच बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही नीटसाठी नोंदणी करु शकतात. परीक्षार्थी १७ ते २५ वर्ष वयोगटातील असावा.