अंधेरी पूल दुर्घटना; मुंबईकरांना करावा लागेल ‘या’ पर्यायी मार्गाने प्रवास

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. आज सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये २ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान यामुळे पश्चिम रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने मुंबईतील चाकरमान्यांचे हाल होतं आहेत. पश्चिम रेल्वे पुन्हा एकदा सुरळीत सुरु होईपर्यंत मुंबईकरांना काही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुरळीत होईल. पश्चिम द्रुतगती मार्गांचा वापर करून मुंबईकरांना पुढील प्रवास सुरु ठेवता येईल.चर्चगेट ते वांद्रे ज्यादा लोकल सोडण्यात आल्या आहेत. अंधेरी पासुन विविध 31 मार्गांवर ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.विलेपार्ले, अंधेरी या स्थानकांमध्ये पुर्व आणि पश्चिम डेपोतून विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत.पश्चिम रेल्वेचे प्रवासी आज मध्य रेल्वे वरून मोफत प्रवास करू शकतात तसेच मेट्रोने घाटकोपर वरून मध्य रेल्वेमार्गे त्यांना जाता येईल.

एस व्ही रोड ते वेस्टर्न हायवे किंवा वेस्टर्न हायवे ते एस व्ही रोड जाणाऱ्यांची मृणालताई गौरे उड्डाणपूल खीर नगर जक्शन मिलन उड्डाणपुल खार सब वे या मार्गांचा उपयोग होऊ शकतो. अंधेरी पूर्व ते पश्चिम असा प्रवास करणाऱ्यांनी बिस्लेरी जंक्शन-तेलीगल्ली-सुर्वे चोंक-अंधेरी सबवे ते एस व्ही रोड-कॅप्टन गोरे उड्डाणपूल विलेपार्ले-पूर्व-आधार जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवासासाठी उपयुक्त ठरेल.वसई विरारला राहणारे नागरिक बसने ठाणे-घोडबंदर मार्गे मध्य रेल्वे मार्गे पोहोचू शकतात.

पादचारी पुलाचा भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प