fbpx

एनडीएची सत्ता येणार नाही; अशोक चव्हाणांना गाढा विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : एक्झिट पोल हे केवळ अंदाज आहे. एनडीएची सत्ता येणार नाही. असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोल नंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. आता संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते ४०  जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचदरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एक्झिट पोल म्हणजे केवळ अंदाज आहे. खरी परीस्थिति मतमोजणी नंतरचं स्पष्ट होईल. असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, राज्यात, कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला २४  ते २५ जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे, ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून विजय मिळवणं कठीण जात असून, भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.