अंबाजोगाई तालुक्यातील 12 पैकी 6 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

pankaja munde & dhananjay munde

परळी: ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या टप्या प्रमाणेच दुसर्‍या टप्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे घवघवीत यश मिळाले आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत अंबाजोगाई तालुक्यातील 12 पैकी 6 ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. भाजपाला 12 पैकी 6 ग्रामपंचायती मिळाल्या असतांना त्यांच्याकडुन मात्र आम्हीच जिंकल्याची खोटी आकडेवारी देऊन रडीचा डाव खेळला जात असल्याच्या प्रतिक्रया व्यक्त केल्या जात आहेत.

7 ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातील परळी तालुक्यातील 74 पैकी 41 तर अंबाजोगाई तालुक्यातील 41 पैकी 25 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय संपादन केला होता. दुसर्‍या टप्यात काल अंबाजोगाई तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्यापैकी पुस, निरपणा, देवळा, साकुड, पाटोदा, धानोरा या सहा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपची पुन्हा एकदा पीछेहाट झाली असुन, त्यांना सायगांव, पिंपळा, धायगुडा, अकोला, तट बोरगांव, दरडवाडी या सहा ग्रामपंचायती जेमतेम जिंकता आल्या. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आ. पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

भाजपचा रडीचा डाव 12 पैकी 6 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असतांना भाजपने मात्र पुन्हा एकदा रडीचा डाव खेळत आम्हीच सर्व ग्रामपंचायती जिंकल्या राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही असे खोटे दावे केले आहेत. भाजपचा हा स्वतःचा पराभव लपवण्याची केवीलवाणी धडपड आहे. राज्यमंत्री मंडळात भाजपच्या पाकलमंत्र्यांचे दिवसेंदिवस वजन कमी होऊ लागल्याने पक्षश्रेष्टींना दाखवण्यासाठी ग्रामपंचायत विजयाचे खोटे दाखले त्यांच्याकडुन दिले जात असल्याची प्रतिक्रया अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रंजितचाचा लोमटे व परळी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद फड यांनी व्यक्त केली आहे.