नगर : प्रदेशाध्यक्षांचे आदेश धुडकावत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दिली भाजपला साथ

jayant patil

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवलं आहे. पण हा विजय राष्ट्रवादी आणि विशेषतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरतोय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली असल्याचं समोर आलं आहे.

‘या निवडणुकीत भाजपला मदत न करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जात नगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला मदत केल्याचं उघड आहे.

आज सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच गाडीतून आले. यानंतर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी हातात हात घालूनच महापालिकेत प्रवेश केला. यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बाबासाहेब वाकळे यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मदतीमुळेच भाजपचा महापौर होऊ शकला आहे.Loading…
Loading...