राष्ट्रवादीचं घड्याळ धोक्यात, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुप्त लाटेमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाला आहे. तर काही पक्षांचा राष्ट्रीयत्व देखील धोक्यात आले आहे. जनतेच्या धक्क्यानंतर आता निवडणूक आयोगही भाजप विरोधी पक्षांना धक्का देणार आहे. हा धक्का शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देखील बसणार आहे. कारण आयोगाने अनेक पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. अशा पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपच्या बलाढ्य आव्हानासमोर झुकावे लागले. ४८ मतदारसंघातून कॉंग्रेस – राष्ट्रवादीला अवघ्या ५ जागा मिळवता आल्या. तर अनेक मतदारसंघातील अस्तित्व देखील धोक्यात आले. त्यामुळे नुसत्या नावाचा गवगवा असणाऱ्या पक्षांचे राष्ट्रीयत्व निवडणूक आयोग काढून घेणार आहे.

आयोगाने राष्ट्रवादीला आज रीतसर नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीसवर राष्ट्रवादीला २० दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न दिल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.