प्रभाग २१ मध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी ; अजित पवारांचा शब्द मोडला ?

pmc

पुणे : दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज ( २३ सप्टेंबर ) अखेरची मुदत होती. या ठिकाणी निवडणूक होऊ नये यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापासून उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांच्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्नाची पराकाष्टा केली पण आज अखेर या १ जागेसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

या जागेसाठी दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या मुलीच्या विरोधात पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता असा दावा रिपाई कडून करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीने असा कोणताच शब्द दिला नसल्याचे सांगत धनंजय गायकवाड यांनी उमेदवारी दिली आहे. आता राष्ट्रवादीने शब्द पाळावा यासाठी रिपाई चे शिष्टमंडळ शरद पवार यांच्या भेटीला सुधा गेले होते.

आधी भाजप आणि आता रिपाई हिमाली कांबळे यांचे २ ए बी फॉर्म

हिमाली कांबळे यांनी आधी भाजपचा ए बी फॉर्म दाखल केला होता. पण आज परत त्यांनी रिपाई चा ए बी फॉर्म देखील जमा केला आहे. त्यामुळे हिमाली कांबळे या कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात की रिपाई च्या ? हे पाहणे औत्स्युक्याच असणार आहे.

नवनाथ कांबळे यांच्या मुलीविरोधात उमेदवार न देण्याचा अजितदादांनी शब्द दिला होता – डॉ.सिद्धार्थ धेंडे

अजित पवार यांनी दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या मुलीच्या विरोधात पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचा शब्द दिला होता याचीच आठवण आम्ही शरद पवार साहेबांना देखील करून दिलीये. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जरी हिमाली कांबळे यांच्या विरोधात फॉर्म भरला असला तरी , फॉर्म मागे घेण्याच्या मुदतीला अजून अवधी आहे तोपर्यंत घडामोडी घडतील आणि राष्ट्रवादी आपला उमेदवार मागे घेईल असा विश्वास रिपाई चे नेते आणि उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी व्यक्त केला आहे.

अजितदादांनी असा शब्दच दिला नाही – चेतन तुपे

अजित दादा यांनी असा कोणताही शब्द दिला नव्हता, अजित दादांनी शब्द दिला होता असे जे लोक बोलत आहेत ही त्यांच्या मनाची कहाणी आहे. आणि हिमाली कांबळे यांनी भाजपच्या चिन्हावर ए बी फॉर्म भरल्याने ही लढाई भाजपच्या विरोधात आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे महापालिका गटनेते चेतन तुपे यांनी व्यक्त केले आहे.