आघाडीत बिघाडी ; कपिल पाटलांवर मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदार कपिल पाटील यांनी लिहलेल्या पत्रामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पत्राच्या माध्यमातून छोट्या घटक पक्षांच्या मनातील खदखद पाटील यांनी व्यक्त केली आहे. या पत्रानंतर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून लेटरबॉम्बमुळे हादरलेल्या राष्ट्रवादीने पाटील यांच्यावर थेट मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे.

कपिल पाटील यांना महाआघाडीत येण्याविषयी काही आक्षेप असतील, तर ते त्यांनी चर्चेत मांडायला हवेत. त्याऐवजी ते पत्रकबाजी आणि ‘बाईट’बाजी करीत आहेत. त्यांचा बोलविता धनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, त्यांच्या इशाऱ्यावरूनच पाटील बोलत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे त्रस्त खा. राजू शेट्टी, आ. कपिल पाटील हे दोघेही बुधवारी दिल्लीत होते. काँग्रेस आणि भाजपा या दोघांनाही पर्याय ठरू शकेल, अशी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू असून त्या दृष्टीने त्यांनी दिल्लीत काही गाठीभेटी घेतल्या आहेत.

दरम्यान, या वादात आता स्वाभिमानी देखील उतरली असून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा इशारा देवून टाकला आहे. एकेक जागा घ्या आणि आमच्या प्रचाराला या, अशी भाषा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात असून आम्हाला गृहित धरले जात आहे. असे असेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी दिला.