पुणे राष्ट्रवादी महिला युवती ‘अॅक्टीव्ह’ तर युवक आघाडी ‘सायलेंट’ मोडवर

अभिजीत दराडे : एकेकाळी पुण्यातील सर्व सत्तास्थानावर राज्य करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभा, विधानसभा तसेच महापालिकेतही दारूण पराभवाला समोर जाव लागले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गड मानाला जाणऱ्या पुण्यावर आता भाजपचे वर्चस्व आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवाची उजळणी करत बसण्यापेक्षा आता नव्या जोमाने सक्षम विरोधक म्हणून काम करणे राष्ट्रवादीसाठी गरजेच आहे. महापालिका सभागृहात त्याचे चित्र पहायला मिळत आहे. पालिके बरोबरच रस्त्यावरही नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठवन पक्षासाठी जमेची बाजू असणार आहे.मात्र सध्या राष्ट्रावादीतील वातावरण पाहता महिला तसेच युवती आघाडी चांगलीच ‘अॅक्टीव्ह’ तर युवक आघाडी ‘सायलेंट’ मोडवर असल्याच दिसून येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर या रस्त्यावरील आंदोलना बरोबरच चांगल्या प्रवक्त्याची बाजू देखील सांभाळत आहेत. पक्षात असणारी प्रवक्त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांची चांगली मदत होत आहे. रुपाली चाकणकर यांच्या कामाच कौतुक पक्ष नेतृत्वाकडूनही केल जात आहे. तर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या मनाली भिलारे याही शहरपातळीवर युवतींमध्ये उर्जा निर्माण करण्याच काम करत आहेत. नजीकच्या काळात वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्याच काम युवतीकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपची जमेची बाजू राहिलेल्या सोशल मिडियाचा वापर देखील दोन्ही आघाड्यांकडून चांगल्या प्रकारे केला जात आहे.

याच्या उलट चित्र युवक आघाडीमध्ये पहायला मिळत आहे. युवती आणि महिला आघाडी मरगळलेल्या राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. तर शहर युवक आघाडीचे काम कासव गतीने सुरु असल्याचे चित्र आहे. युवक शहराध्यक्ष असणारे राकेश कामठे यांचा युवक आघाडीवर वचक नसल्याचे चित्र सरळ दिसत आहे. एकीकडे अजित पवार यांनी काम करणाऱ्यांनाच पद दिले जाईल असे स्पष्ट केल्यानंतर राकेश कामठे हे युवक आघाडी मध्ये आक्रमकता आणतील असे वाटत होते मात्र, तसे होताना दिसत नाही

काही तुरळक आंदोलन सोडता संघटन कौशल्यात युवक शहराध्यक्ष हे पिछाडीवर दिसत आहेत. मध्यंतरी अजित पवार यांनी आढावा बैठक घेऊन युवक आघाडीमध्ये खांदेपालट करण्याची गरज असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता शहरात मरगळ आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक आघाडीमध्ये जीव ओतण्यासाठी आता कामठे यांना जीवाचा रान करावे लागणार आहे.