fbpx

शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा १५ डिसेंबरला जबाब दो मोर्चा

नाशिक : दत्तक घेतलेल्या नाशिक कर पालिकेकडून होत असलेले दुर्लक्ष, त्यांचा कामचुकारपणा, सर्वसामान्य जनतेचे धोक्यात आलेले आरोग्य व नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिकेवर शुक्रवार १५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता बी.डी.भालेकर मैदान ते नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य कार्यलयावर जबाब दो मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा सर्वसामान्य नाशिककरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी काढण्यात येणार असल्याने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मोर्च्याचे आयोजक युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

नाशिकच्या जनतेची दिशाभूल करीत मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी प्रशासनाला जाब विचारण्याकरिता हजारोच्या संख्येने “जबाब दो मोर्चा” काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून या समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

स्मार्ट सिटीकडे नाशिकची वाटचाल होत असताना नाशिककर अनेक समस्यांना तोंड देत आहे. शहरातील डेंग्यू व स्वाइन फ्ल्यू सदृश आजाराचा प्रश्न, तोट्याचे कारण देत व मनपा सर्व्हेक्षणामुळे कमी झालेल्या बसफेऱ्या, नाशिकमधील रस्त्यांची अक्षरशः झालेली चाळण, महापालिकेच्या बिटको व झाकीर हुसेन सारख्या रुग्णालयाची दयनीय अवस्था, शहरात पार्किंगचा प्रश्न अतिशय महत्वाचा असतांना एआरच्या माध्यमातून विकासकांनी घशात घातलेल्या जमिनी, घंटागाडीच्या वेळेवर ना येणे, रस्त्यावर मोकाट जनावरे पिसाळलेले श्वान डुकरे यांचा त्रास, शहरातील उद्याने, क्रीडा संकुले, मोकळे खेळ मैदाने, जॉगिंग ट्रॅक जागेवर उगवलेले गाजर गवत, घाण व कचऱ्याचे साम्राज्य, गोदावरी-नंदिनी नद्यांमध्ये वाढत असलेले प्रदूषण, धूरफवारणी व औषधफवारणी वेळेवर न होणे, मुख्य रस्त्यावर अडथळा ठरून अपघात होणाऱ्या वृक्षाचे अद्यापही न झालेले पुनर्रोपण, नाशिकनगरीतील धार्मिक तीर्थक्षेत्र स्थळे आणि पर्यटनस्थळांची अवकळा यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा हजारोंच्या संख्येने निघणार असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.